1. यात दिलेले औषधाचे प्रमाण हे एकवेळाचे आहे. जितके वेळा औषध घ्यावयाचे आहे, तितके वेळा नवीन औषध (आवश्यक आहे तेच ) करून घ्यावे.
2. ' बालक - स्वास्थ्य ' प्रकरणाखेरीज इतरत्र सांगितलेल्या औषधांचे प्रमाण प्रौढ माणसासाठी आहे. दहा वर्षाखालील मुलांना अर्धा व दोन वर्षाखालील मुलांना पाव भाग औषध द्यावे.
3. काढा करण्याची रित : औषधाच्या आठ पट पाणी घेऊन ते निम्मे राहिपर्यंत आटवल्याने काढा तयार होतो.
4. अनुपानासाठी (औषधात मिसळण्याची घटक) मध न मिळाल्यास गूळ किंवा साखर वापरावी. खडीसाखर किंवा पीठीसाखर न मिळाल्यासही साखर वापरावी.
5. त्वचेचे रोग असल्यास रोग्याने अंघोळीच्यावेळी शक्यतो साबण न वापरता चण्याचे पीठ किंवा कडुनिंब अथवा शिकेकाई पाण्यात उकळून त्याचा अंगाला लावण्यासाठी उपयोग करावा.
6. गोदंती टाकणखार, मोरचूद व तुरटी औषधासाठी वापरताना तव्यावर फुलवून लाही करून वापरावी. तसे केल्याने त्या पदार्थाची शुद्धी होते.
7. कानांत तेल घालताना ते कोमट करून घालावे.
8. कांही औषधे, गोळ्या तयार करून ठेवण्यासारखी आहेत, ती करून ठेवावीत, म्हणजे गरजेच्यावेळी पट्कन उपयोग होतो.
9. कापूस वापरताना त्यातील कचरा प्रथम काढून टाकावा.
10. कोणतेही औषध घेण्यापूर्वी किंवा देण्यापूर्वी ' ईशस्मरण ' करावे, म्हणजे त्यातील गुण वाढून त्याचा चांगला फायदा होतो व दोष टळून जातात.
11. ताजी वनौषधी धुवून साफ करून तीन तासांच्या आत वापरावी. पडिक, घाणेरड्या जागेतील वनस्पती घेऊ नये.
12. निरोगी माणसाचे शरीराचे सामान्य तपमान 97^ फॅरनहीट असते. तसेच निरोगी मध्यम वयाच्या माणसाची नाडी मिनिटाला 72 ठोके असते व रक्तदाब 120 मि. मि. सि सिस्टॉलिक व 80 मि. मि. डायस्टॉलिक असतो.
0 Comments