सूर्यापासून मिळणारा प्रकाश आणि उष्णता आपण पाहूं शकतो. ही त्याची स्थूलशक्ती प्रकटरूप झाली. परंतु यांत एक अदृश्य, सूक्ष्म सत्तात्मक व अव्यक्त शक्ती असते व ती एखाद्या झऱ्याप्रमाणे निरंतर प्रकाशकिरणांमधून वहात असते, तिलाच 'महाप्राणशक्ती' असे म्हणतात. ही महाप्राणशक्ती जेव्हा प्रकाश व वायू माध्यमातून शरीरात प्रवेश करते, तेव्हा आरोग्य, दीर्घायुष्य, बल, वीर्य, तेज, उत्साह आणि स्फूर्तीच्या रूपांत ती अनुभवास (दृग्गोच्चर) येते.
जेव्हा ही प्राणशक्ती प्रकाश (तेज) व (मंत्र) ध्वनीकंपनांच्या माध्यमातून मनात प्रवेश करते, तेव्हा स्फूर्ती, सदभावना, एकाग्रता, स्थिरता, धैर्य आणि मनःशांतीच्या रूपांत ती अनुभवता येते. जेव्हा हीच महाप्राणशक्ती बुद्धीक्षेत्रात (मस्तकांत) प्रवेश करते, तेव्हा श्रद्धा, विश्वास, संयम (विवेक), समजूतदारपणा, आत्मीयता, निरीक्षण, प्रेम, करुणा, दया, आदी भावनांनी अनुभवता येते. ही आयोनोस्फेरीक प्लाझ्मा शक्ती चर-अचर, दृश्य-अदृश्य, सूक्ष्म-विशाल, जड-अजड अशा जगताचा प्राणच आहे. चुंबक, प्रकाश, उष्मा, विद्युत ही याच महाप्राणशक्तीची अन्य स्वरूपे आहेत.
'प्राणशक्ती' हा भावनातीत विचार आहे. तो शब्दरूपांत किंवा चित्ररूपांत प्रकट करता येत नाही. तो प्रकाशात्मक असून अतिसूक्ष्म परंतु तीव्र विचारात्मक असा आहे. ही शक्ती इतकी कंपनशील विचारशक्ती आहे की तिला आपल्या स्थूल इंद्रियांच्या जाळ्यांत पकडता येत नाही. ती परावेग किरणांहून अधिक जलद व प्रखर आहे. मनाप्रमाणे स्पंदनशील आहे. इंद्रीयातीत असूनही ती भावनेद्वारा ग्रहण करता येते.
या शक्तीच्या तीव्रतेच्या प्रमाणावर महर्षी अरविंदांनी या प्राणशक्तीची चार भागात विभागणी केली आहे ती अशी -
- (1) निम्नतर प्राणशक्ती
- (2) निम्न प्राणशक्ती
- (3) उच्च प्राणशक्ती व
- (4) उच्च तर प्राणशक्ती.
याचप्रमाणे महर्षि अत्रि ऋषींनी या प्राणशक्तीची
- (1) मंदप्राणशक्ती
- (2) मध्यम प्राणशक्ती व
- (3) गहन प्राणशक्ती - अशी तीन भागांत विभागणी केली आहे.
मंदप्राणशक्ती असलेले मानवप्राणी हे मानसिक, आत्मिक व बौद्धिक दृष्टया अती दुबळे असतात. अशा व्यक्ती भ्याड, कर्तृत्वहीन, योग्य विचार करण्याची कुवत नसलेले, स्वमत नसलेले, बोलताना अस्पष्ट व तुटक बोलणारे व तेजोहीन असे असतात.
मध्यमप्राणशक्ती असलेल्या व्यक्ती योग्य विचार करणाऱ्या, योग्य निर्णय घेऊ शकणाऱ्या, आत्मविश्वास व बौद्धिक क्षमता असलेल्या व कर्तृत्ववान अशा असल्याने त्या व्यवहार, शिक्षण, व्यवसाय यांत योग्य ती सफलता मिळवू शकतात. मात्र ते महत्वाकांक्षी असूनही आपल्या इच्छांवर योग्य ते नियंत्रण ठेवण्याची कुवत त्यांच्यापाशी नसते. ते मोह, संभ्रम, विभ्रम, अस्थिरता आणि अंर्तद्वंद्वांची शिकार बनतात.
सर्वसामान्य लोक हे मध्यम प्राणशक्ती धारक असतात. गहन प्राणशक्ती असलेल्या व्यक्ती ह्या सर्वार्थाने महान, योगिक अवस्थेप्रत गेलेल्या व विश्ववंद्य अशा असतात. अशी ही सजिवांचे अस्तित्व राखणारी 'प्राणशक्ती' आपणाला सूर्यापासून मिळते. उष्णता, प्रकाश, विद्युत, चुंबकत्व, गुरुत्व आणि ध्वनीलहरींपेक्षाही ती अधिक तीव्र आहे. हीच चैतन्यशक्ती अनेकविध भौतिक शक्तींमध्ये रुपांतरीत झालेली असते.
'प्राणो S पि भगवानीश: प्राणो विष्णु: पितामह ।
प्राणेन धार्यते लोक:, सर्व प्राणमयं जगत ।।'
सूर्यापासून वितरीत होणारी ही प्राणशक्ती, प्रकाश, वायू आणि ध्वनी कंपनलहरीं यांच्या माध्यमातून सतत आपणाला मिळत असते.
ही शक्ती
(1) सतत दीर्घ श्वसनाने
(2) कोवळ्या सूर्यप्रकाशांत राहून
(3) गायत्री (गाय = प्राण, त्रीं = रक्षण करणारी = प्राणांचे रक्षण करणारी ती गायत्री)
या सूर्यमंत्र जपध्वनीने आपणाला अधिक प्रमाणात मिळविता येते. यामुळे आत्मबल वाढेल आणि हे आत्मबल मनोबल आणि शरीरबल यांना सुदृढ ठेवील. ज्याचे मनोबल श्रेष्ठ त्याचे शरीरबलही श्रेष्ठच असते. निरोगी राहून दीर्घायुषी होऊ ईच्छिणाऱ्या व्यक्तींनी ही गोष्ट कदापी विसरून चालणार नाही.
आजारी व्यक्तीचे मनोबल त्याला धीर देऊन वाढवावयाचे असते ते याचसाठी, जेणेकरून तो आपल्या आजाराशी धैर्याने लढूं शकतो व यशस्वी होतो. म्हणजेच कोणतीही व्याधी ही केवळ औषधांनीच बरी होत नसते, तर तिला मनोबलाची म्हणजेच श्रेष्ठ आत्मशक्तीची (प्राणशक्तीची) सुद्धा गरज लागते.
मन:शक्ती :
आपले शरीर हे असंख्य पेशींनी मिळून बनलेले असते, व त्यापैकी प्रत्येक पेशीला मन असते. या सर्व पेशीतील मन एकत्र येऊन 'महामन' तयार झाले आहे. पायाच्या बोटाच्या अग्राला टांचणीने टोंचले असता तात्काळ मस्तकापर्यंत तिच्या संवेदना जाणवतात, याचे कारण हे मनाचे व्यापकत्व आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, शक्ती ही कणाकणाने एकत्र संग्रहीत होते आणि ती मन:शक्ती संग्रहीत होऊन आत्मबल वाढविते.
आजारी माणसाचे मनोधैर्य खच्ची झाल्यानेच आजार बळावतो हे नेहमीच अनुभवास येते. रुग्णाचे मनोधैर्य वाढल्यानेच केवळ असाध्य आजारातून रोगी बरा झाल्याची कैक उदाहरणे नित्य पाहण्यात येतात. याकरिता प्रत्येक व्यक्तीने आपले मनोबल, सदविचार आणि सत्संग याद्वारे वाढविण्याचा व कायम ठेवण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे शरीर स्वास्थ्य अबाधीत राहील.
रंग-शक्ती :
निसर्गातील प्रत्येक वस्तु, मग ती जड असो की अजड असो, स्वतःच्या शरीरातून सप्तरंग प्रसारित करीत असते आणि याचा संबंध सूर्यप्रकाशाशी आहे. सूर्यप्रकाशान्तर्गत तां, ना, पि, ही,नि,पा, जां, (तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांरवा व जांभळा) हे सप्तरंग असतात व सप्तरंगाचे पट्टे असलेली गोल चकती वेगाने फिरवली असतां एकच पांढरा रंग दिसतो हे या छोट्या प्रयोगातून आपण अनुभवतो.
पावसाळ्यांत पावसाच्या सरीतून सूर्यकिरणांचे परावर्तन होऊन आकाशात तयार झालेले इन्द्र धनुष्यही आपण पहातो, तेही याच गोष्टीचे निदर्शक आहे. अतिन्द्रीय शक्तीचे अभ्यासू व्यक्तींच्या शरीराभोवतीच्या ह्या सप्तरंगांच्या वलयातून, रंगांच्या कमी अधिक प्रमाणातील उत्सारीत तेजाचे निरीक्षण करून व्यक्तीच्या शरीरातील रोगाचे निदान करतात.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
0 Comments