Header Ads

निसर्ग व शारीरिक ( पंच महाभुते ) समन्वय कसा साधाल ?


मानवी जीवनात 'स्वास्थ्यपूर्ण'  जीवनाला अनन्य साधारण महत्व आहे.  मानवजीवनातील प्रपंचसुख हे आरोग्यसंपन्न असलेल्या कुटुंबियांच्या स्थितीवरच आधारभूत असते.  याकरिता प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घेतली पाहिजे.  शरीराच्या गरजेप्रमाणे योग्य आहार घेणे, योग्य ती विश्रांती घेणे, आणि योग्य शक्तीनुरूप काम करणे ही यशस्वी व सुखी जीवनाची त्रिसूत्री आहे हे कदापि विसरून चालणार नाही.


"भूक असताना खाणे ही प्रकृती,  वाटेल तेव्हा वाटेल ते खाणे ही विकृती, आणि आपल्या भाकरीतील अर्धी दुसऱ्या भूकेलेल्याला देणे ही संस्कृती होय".

आरोग्यसंपन्न जीवनासाठी नियम म्हणून काही पथ्ये पाळणे अत्यावश्यक आहेत.  शरीराला रोज काही प्रमाणात तरी व्यायाम होणे आवश्यक बाब आहे. शरीर कष्टाचे काम नेहमी करणाऱ्या व्यक्तींना मात्र वेगळ्या व्यायामाची गरज उरत नाही.  इतरांना मात्र मोकळ्या हवेत वेगाने चालणे, नमस्कार व्यायाम घेणे,  पोहोण्याचा व्यायाम घेणे यासारख्या हलक्या फुलक्या व्यायाम प्रकारांची गरज असते.  खाल्लेले नीट पचणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण असते. बहुतांशी व्याधी ह्या पचनक्रियेतील बिघाड आणि बद्धकोष्ठता ( पोट व्यवस्थित साफ न होणे )  यांमुळेच निर्माण होत असतात.  यासाठीच 'संयम' हा जीवनातील सर्व प्रकारच्या स्वास्थ्याचा केन्द्रबिंदू ठरला आहे.

आधुनिकतेच्या (Modern Life)  नावाखाली शरीराला आरोग्यघातक सवयी लावून घेणे म्हणजे सुखी व स्वास्थ्यपूर्ण जीवनाला सुरूंग लावण्यासारखे आहे.  भूकेच्या वेळी सत्वयुक्त अन्न पोटात गेले पाहिजे,  अतिरिक्त तेलकट, तुपकट पदार्थ, रस्त्यावर उभे राहून घाईघाईने खाणे म्हणजे जेवण नव्हे.  तहान लागली म्हणजे शुद्ध पाणीच प्यायले पाहिजे,  कोल्डड्रिंक्स नव्हे.  याच बरोबर स्वच्छतेने राहणे, वागणे हेही आवश्यक आहे.  मूळांत ग्राहक स्वच्छ राहिला तरच खानावळी व उपाहारगृहे स्वच्छ राहतील,  'स्वच्छता' ही सामाजिक बांधिलकी आहे हे प्रत्येकानेच लक्षात ठेवले पाहिजे.
निसर्ग आणि आपण :

आपण सर्व मानव सध्या विज्ञान युगात वावरत आहोत.  भौतिक सुखाचे अनेक पर्याय आम्ही शोधून काढले, परंतु याचबरोबर कृत्रिमतेच्या अधिक आहारी गेलो.  याचा दुष्परिणाम एव्हढाच झाला की निसर्ग आम्हाला दूरावला नि यामुळे आम्ही अधिक वेगाने स्वास्थ्यहीन झालो.  निसर्गाच्या सान्निध्यात रहाणारा जीव नेहमीच स्वास्थ्यपूर्ण जीवन जगत आला आहे.  रानावनातून मुक्त जीवन जगणारा चतुष्पाद प्राणी वर्ग आणि मानवप्राणी हे सहसा व्याधीग्रस्त आढळत नाहीत.  खेडेगावातील ग्रामवासी व शहरातील शहरीबाबू या दोघांच्या आरोग्यातील तफावत तर आपण नेहमीच अनुभवतो.  आज सगळीकडेच जीवन जगण्याची जी असह्य धडपड चालली आहे, तिने आमचे जीवनच पोखरून टाकले आहे.  शुद्ध स्वरूपांत आज कोणताही पदार्थ आपल्या पोटात जात नाही. 

दूषित हवा, दूषित पाणी व दूषित अन्न यांवर आजची पिढी पोसली जात आहे.  ठराविक गाडीची वेळ साधण्यासाठी आमची जी धडपड, धावपळ चाललेली असते, तिने तर तोंडचा घांसच पळविला आहे,  आणि केवळ ह्या यांत्रिकतेने होत असलेल्या शरीर, मन, बुद्धी यांच्या झीजेमुळे आज हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब आणि कॅन्सर ह्या विकारांनी आपले जीवनच झाकाळून टाकले आहे.  याकरिता प्राथमिक स्वरूपाचा उपाय हाच की आरोग्य शास्त्राने सांगितल्याप्रमाणे अधिकाधिक नैसर्गिक स्वरूप कायम रहाणारे अन्न व पाणी आपण घेतले पाहिजे.  अर्धवट शिजलेल्या पालेभाज्या, डाळी, फळभाज्यांच्या कोशिंबीरी, अंडी, सकस दूध, ताजे मांस-मासे इत्यादी पदार्थांचा उपयोग आपल्या आहारात जास्तीत जास्त करून घेणे अत्यंत हितावह आहे.

निसर्गाने एक मोठा दिलासा सर्व प्राणीमात्रांना देऊन ठेवला आहे,  आणि तो हा की, जिथे रोग होतो, तिथेच औषधी वनस्पतींच्या स्वरूपात उपायही योजून ठेवला आहे.  प्राणी ज्या भू भागावर वास्तव्य करतो त्या भूमीच्या हवामानात रुजलेली औषधीच त्याला स्वास्थ्यकारक असते.


   'यस्य देशस्य यो जन्तुस्तज्जातस्यौषधं, हितम।
 देशादन्यत्र वसतस्तन्तुलं गुणमौषधम ।'

या सूत्रातूनच आयुर्वेदाचा  जन्म झाला आहे.

शरीर-स्वरूप :

निसर्गातील प्रत्येक पदार्थ हा कणाकणांचा बनलेला असतो.  या कणांच्या परस्परांतील स्थापित अंतराप्रमाणे त्या त्या पदार्थाला स्थायु, द्रव किंवा वायु अवस्था प्राप्त झालेली असते.  सजीव प्राण्याच्या शरीर-कणांनाच 'पेशी' असे म्हणतात.  अशा असंख्य पेशींनी प्राण्याचा देह साकार झालेला असतो.  या देहामध्ये  कार्बोहायड्रेट, मेद, प्रोटिन्स, गंधक, लोह, अमोनिया, फॉस्फरस,अभ्रक, क्षार, पाणी आदी द्रव्ये समाविष्ट असतात.  प्राणी ज्या जीवनावश्यक हालचाली व श्रम करतो, त्याने होणारी त्याच्या शरीरपेशी, कार्यशक्ती व उष्णता यांची झिज भरून काढण्यासाठी त्याला अन्न व पाणी यांची गरज असते. 

शरीरात व्याधी निर्माण होणे याचाच अर्थ त्याच्या शरीरांतर्गत मूलद्रव्यातील प्रमाण बिघडले आहे हा होय.  त्याकरिता त्या त्या व्याधीच्या अभ्यासानुसार आवश्यक ते मूलद्रव्य औषधी पदार्थातून शरीराला पुरविणे आवश्यक असते.  हे प्रमाण समतोल झाले की आजार बरा होतो.  मूलतः वात, पित्त, कफ ह्या (त्रिदोषांवर) शरीरप्रकृतीची रचना निसर्गतःच झालेली आहे.  या दोषांचे प्रमाण कमीजास्त झाले की प्रकृतीत बिघाड निर्माण होतो.  "वात, पित्त, कफ ह्या त्रिदोषांचे प्रमाण सम रहाणे म्हणजेच उत्तम आरोग्यसंपन्नता होय" असे आयुर्वेदाचे स्पष्ट म्हणणे आहे.

निसर्ग ज्याप्रमाणे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पांच महातत्वांपासून किंवा महाभूतांपासून बनलेला आहे.  तद्वत प्रत्येक सजीवाचे शरीरही याच पाच तत्वांपासून निर्माण झाले आहे.  याचाच अर्थ असा की निसर्गाचा घटक सजीव देह हाही आहेच.  याकरितांच सजीव देह जितका निसर्गाशी तादात्म्य पावेल, त्याच्या जितका जवळ राहील तितकाच तो अधिक सुरक्षित राहील हे निश्चितच.  मात्र नैसर्गिक संकेत समजून घेण्याची कुवत किंवा क्षमता ज्याची त्यानेच निर्माण करून घेतली पाहिजे.

आपल्या शरीराचा निसर्गातील पाचही तत्वांशी अत्यंत निकटचा व महत्वाचा संबंध आहे.  परंतु सर्वात जास्त संबंध वायुशी आहे.  वातावरणातील हवेमध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर, सोडियम, मँगनीज, लोह, आयोडीन, क्लोरीन, ऑक्सिजन, पाण्याची वाफ तसेच धुळीचे सूक्ष्म परमाणू असतात.  आपण श्वासोश्वासाबरोबर फक्त जंतुमिश्रित हवाच घेतो असे नसून शरीरोपयोगी वरील सर्व खनिज व रासायनांनाही ठराविक प्रमाणात ग्रहण करतो आणि म्हणूनच आपल्या शरीराचे भरण पोषण योग्य तऱ्हेने होते.  आपल्या शरीरात अत्यंत महत्वाचा भाग 'प्राण' ( जीव,  आत्मा ) हा असल्याने त्याला सतत उत्तेजित ठेवणाऱ्या 'ऑक्सिजन' या वायूला 'प्राणवायू' असे म्हणतात. 

आपल्या दीर्घ श्वसनाबरोबर हवेतील सूक्ष्मातिसूक्ष्म जंतू शरीरात प्रवेश करून राहतात आणि हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन शरीरस्थ जीवाणूंचे 'प्रोटीन्स' मध्ये रूपांतर करून घेऊन शरीर पोषणाला कारणरूप ठरतात.  म्हणजेच आम्ही शुद्ध स्वरूपात 'अहिंसक' नाही आहोत तर!  याचबरोबर हवेत पसरलेल्या सूक्ष्म रोगजंतूंचाही श्वसनाबरोबर किंवा अन्न, पाणी यांच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश होऊन ते शरीरस्वास्थ्याची हानी करतात याकरिता निसर्गातील सूर्यशक्ती, जिला 'महाप्राणशक्ती' असे म्हणतात, ती अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

Translater

Post Top Ad

Post Bottom Ad

Powered by Blogger.